राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते तीनपट जास्त दराने ग्राहकांना खरेदी करावी लागते. मध्यस्थांची वाढलेली साखळी, वाहतुकीवरील खर्च व व्यापाऱ्यांची नफेखोरी यामुळे आपला भाजीपाला दिवसेंदिवस महाग होत चालला आहे.
बाजार समितीमध्ये २२० ते ३२० रुपये किलोचा लसूण मुंबईकरांना ५०० ते ६०० रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. ३५ ते ६२ रुपयांचा कांदा ८० ते १०० रुपयांवर पोहोचला. १६० ते २०० रुपयांचा वाटाणा २५० ते २८० रुपये किलो दराने विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे जनसामान्य त्रस्त आहेत.
दुसरीकडे वर्तमानपत्र उघडली, टीव्हीवरील बातम्या ऐकल्या की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वाचायला व ऐकायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व शेतकऱ्यांना स्वस्तात कोणतीच वस्तू मिळत नाही. हा टोकाचा विपर्यास कसा? याचे कोडे सामान्य नागरिकांना अद्याप सुटलेले नाही.
भाजीपाला महाग होण्याचे कारण
भाजीपाला महाग होण्याचे सर्वांत प्रमुख कारण मध्यस्थांची वाढलेली साखळी. शेतकरी भाजीपाला पिकवतो व व्यापाऱ्याला विकतो. तालुका व जिल्हास्तरावरील व्यापारी तो मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवतो. यासाठी वाहतूक खर्च, तोलाई, लेव्हीवर द्यावी लागते, किरकोळ विक्रेत्यांना अडत कमिशन बाजार फी, प्रत्येक गोणीची चढउतार करताना माथाडी कामगारांची मजुरी द्यावी लागत आहे.
वाहतूक करून मंडईमध्ये भाजीपाला घेऊन गेल्यानंतर तेथील जागा भाडे व इतर खर्च करावा लागतो. भाजीपाला नाशवंत माल आहे. सायंकाळपर्यंत भाजीपाल्याची विक्री झाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याची किंमत कमी होते. काहीवेळेस भाजीपाला फेकून द्यावा लागतो. प्रत्येक ग्राहकाला वजनापेक्षा थोडा जास्त माल द्यावा लागतो. यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढावी लागत असल्यामुळे बाजार समितीपेक्षा किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर दुप्पट होत आहेत.
अन्यथा शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक सुरूच राहणार
- ६ ते ७% – अडत कमिशन• तोलाई, लेव्हीसह इतर ४ टक्के खर्च होतो.• शेतकरी ते मुंबई वाहतुकीवर १८% खर्च• बाजार फी, माथाडी कामगाराची १% मजुरी, स्थानिक वाहतुकीचा खर्च, मंडईमधील जागाभाडे, भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण या सर्व गोष्टींमुळे आपला भाजीपाला महाग होत आहे.
ही महागाई कमी करण्यासाठी मध्यस्थांची साखळी कमी करणे व शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची सुविधा तयार करणे हाच उपाय असून, त्याकडे शासनस्तरावर गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. थेट पणन व शेतकरी बाजार या उपाययोजना फक्त कागदावर न राहता, त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली तर आपला भाजीपाला स्वस्त होणार आहे. अन्यथा अन्नसाखळीतील शेतकरी व ग्राहक दोघांची पिळवणूक सुरूच राहणार आहे.